आता खुशाल विसरा पासवर्ड

Maharashtra Times | Sep 23, 2015, 05.00 AM IST
हितेश वैद्य, कॉलेज क्लब रिपोर्टर, मुंबई
कम्प्युटर असो, इंटरनेट असो, मोबाइल असो... या व्यवहारांचे पान पासवर्डखेरीज हलत नाही. मात्र मायक्रोसॉफ्टने हा पासवर्डच हद्दपार करण्याचे ठरवले असून, विंडोज १०मध्ये मायक्रोसॉफ्टने अकाऊण्ट लॉगइन करण्यासाठी विंडोज हॅलो हे अनोखे फिचर उपलब्ध करून दिले आहे.
'विंडोज बिझनेस ग्रुप'चे संचालक विनीत दुरानी यांनी मंगळवारी याबाबतची माहिती येथे दिली. विंडोज हॅलोमध्ये 'फेस रेकग्निशन' आणि 'बायोमेट्रिक स्कॅनिंग' वापरून अकाऊंटचे कुलुप उघडले जाईल. कम्प्युटर वा मोबाइलमधील डेटा सुरक्षित राखण्यासाठी ही नवी पद्धती अधिक परिणामकारक ठरेल, असा विश्वास दुरानी यांनी व्यक्त केला. अनेकजण पासवर्ड लक्षात रहावा, यासाठी तो खूपच सोपा ठेवतात. अनेकदा पासवर्ड विसरण्याचेही प्रसंग येतात. त्यावर हा उत्तम उपाय ठरेल.
सुरक्षेचे इतरही अनेक पर्याय या सिस्टीममध्ये देण्यात आले आहेत. या सिस्टीमसाठी लागणारे हार्डवेअर (फिंगरप्रिंट रीडर, आयआर किवा बायोमेट्रिक सेन्सर्स) अद्याप सगळे मोबाइल वा कम्प्युटरमध्ये उपलब्ध नसल्याने ही नवीन पद्धत प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी आणखीन काही काळ जावा लागेल.
दुरानी यांनी यावेळी विंडोजच्या भविष्याताली वाटचालीची कल्पना दिली.
विंडोज १० हे विंडोजचे शेवटचे व्हर्जन असेल. फक्त लिनक्सप्रमाणे विंडोजचे वर्षातून चार अपडेट्स येतील. त्यामुळे आता यापुढे येणाऱ्या विंडोजमध्ये संपूर्णपणे वेगळे असे काही नसेल.
सर्व काही कनेक्ट होणार
आर्टिफिशल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आदी तंत्रज्ञान वापरून भविष्यात मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या आधारे ऑटोमेशन क्षेत्रात काम करेल. उदाहरणार्थ, तुम्ही फोनवर बोलत आहात आणि तुम्ही बोलता बोलता कारमध्ये बसलात, तर तुमच्या कारला हे कळायला हवे कि ड्रायव्हिंग करताना कॉल मोबाइलवर नव्हे, तर कारमधील स्पीकर वर चालला पाहिजे, आणि तशी कृतीदेखील घडली पाहिजे.
तुमचा सगळा डेटा हा क्लाउडवर, म्हणजेच इंटरनेटवर असेल. यामुळे तुम्ही कुठूनही, कोणत्याही डिवाइसवरून तुमचा डेटा अॅक्सेस करू शकाल. त्यामुळे प्रत्येक वेळेस डेटा सेंटर्स, सर्वर्स किवा स्टोरेज ड्राइव वापरण्याची गरज भासणार नाही.

No comments:

Post a Comment